शेतातून चार फुटांवर लोंबकळणारी वीजवाहिनी; नंद्राबादच्या शेतकऱ्याचा जीव धोक्यात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील नंद्राबाद येथे एका शेतकऱ्याच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शेतातून गेलेली विद्युत वाहिनी गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत असून, तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
नंद्राबाद येथील गट क्रमांक ५८ मधील संबंधित शेतकऱ्याच्या शेतीमधून गेलेली वीजवाहिनी जमिनीपासून अवघ्या चार फुटांवर लोंबकळत आहे. त्यामुळे शेतात काम करणे तर दूरच, पण त्या परिसरात जाणेसुद्धा धोकादायक बनले आहे. या तारांमुळे शेतीतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, गेल्या अनेक वर्षांपासून ही जमीन पडीत पडली आहे.
शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, या धोकादायक वीजवाहिनीबाबत त्यांनी अनेक वेळा महावितरणकडे तक्रार केली. गेल्या ११ महिन्यांपासून ते महावितरणच्या कार्यालयात वारंवार चकरा मारत आहेत. मात्र, संबंधित अधिकारी आणि अभियंते केवळ आश्वासनं देत असून, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
या वीजवाहिनीमुळे केवळ शेतीचे नुकसान होत नाही, तर शेतातील जनावरे आणि स्वतः शेतकऱ्याच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. अवघ्या चार फुटांवर असलेल्या तारांमुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. “एखादा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागं होणार का?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच, संबंधित विद्युत वाहिनीची उंची तातडीने वाढवावी किंवा ती दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी महावितरणने तातडीने दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.



