नागपुरात कायद्यालाच उघड आव्हान! गस्तीवरील PSI वर चाकू हल्ला; बुलेट लुटून आरोपी फरार

नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कळमना पोलीस ठाण्याचे पीएसआय सचिन वाकलेकर यांच्यावर गस्ती दरम्यान जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपींनी त्यांच्यावर चाकूने वार करत गंभीर जखमी केले आणि त्यानंतर त्यांची बुलेट मोटरसायकल लुटून पळ काढला. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे.
ही घटना नागपूरच्या कळमना परिसरातील डेप्युटी सिग्नलजवळ घडली. पीएसआय सचिन वाकलेकर हे नियमित गस्तीवर असताना त्यांना एक संशयास्पद दुचाकीस्वार दिसला. त्यांनी तातडीने त्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला अडवले. त्यानंतर आरोपीला पोलीस ठाण्यात नेण्याची तयारी सुरू असतानाच त्याचे दोन साथीदार घटनास्थळी पोहोचले.
आरोपींनी अचानक पीएसआय वाकलेकर यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आला. या हल्ल्यात वाकलेकर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हल्ल्यानंतर आरोपींनी पीएसआय वाकलेकर यांची बुलेट मोटरसायकल हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून फरार झाले. आरोपींच्या दुसऱ्या साथीदाराने स्वतःच्या दुचाकीवरून पलायन केले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने शहरभर नाकाबंदी करत शोधमोहीम सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महेंद्र ऊर्फ मयंक उईके, धर्मेंद्र सयाम आणि सोनू मरसकोल्हे यांचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी मूळचे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील असून नागपुरात मजुरीचे काम करत होते.
तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. मुख्य आरोपी महेंद्र उईके याच्याकडे आधार कार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र नव्हते. त्यामुळे आरोपींचा माग काढताना पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर नागपूर पोलीस आयुक्त रवींदर सिंगल यांनी शहरातील व्यापारी, बांधकाम व्यावसायिक आणि मजूर ठेवणाऱ्या ठेकेदारांना मजुरांची ओळखपत्रे तपासूनच त्यांना कामावर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
या घटनेमुळे एक मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे — जेव्हा पोलीस अधिकारीच सुरक्षित नाहीत, तेव्हा सामान्य नागरिकांचे काय? नागपुरातील ही घटना केवळ एका पोलीस अधिकाऱ्यावरचा हल्ला नसून, ती कायद्याला दिलेलं उघडं आव्हान मानली जात आहे. आता या आरोपींवर कठोर कारवाई होते का, आणि अशा घटनांना आळा बसतो का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



