लखनऊमध्ये भीषण आग! १००० पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक, सिलिंडर स्फोटांनी हादरला परिसर

लखनऊ — उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील विकास नगर परिसरात बुधवारी संध्याकाळी भीषण आग लागून मोठा अनर्थ घडला. झोपडपट्टीत लागलेल्या या आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण करत १००० हून अधिक घरं जळून खाक केली.
संध्याकाळी सुमारे ४ वाजता लागलेली ही आग इतकी भीषण होती की, बघता बघता १०० हून अधिक गॅस सिलिंडरचे एकामागोमाग एक स्फोट झाले. या स्फोटांच्या आवाजाने तब्बल १० किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. आकाशात २० ते ३० फुटांपर्यंत ज्वाळांचे लोळ आणि धुराचे ढग दिसत होते.
अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आगीने मोठा फैलाव केला होता. जवळपास ८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र, घटनास्थळी फक्त लोखंडी आणि पत्र्याचे सांगाडे उरले असून सर्व काही राख झालं आहे.
या भीषण आगीत गरीब मजुरांच्या हजारो झोपड्या जळाल्या असून, कोंबड्या, शेळ्या आणि कुत्र्यांसह सुमारे ५० हून अधिक जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आपले कुटुंबीय आगीत अडकले असल्याच्या भीतीने नागरिक सैरावैरा पळत होते. दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांना रोखल्याने संतप्त जमावाने दगडफेक केली. यात काही पोलीस आणि सिव्हिल डिफेन्स कर्मचारी जखमी झाले.
अग्निशमन दलासमोर एकीकडे भीषण आग आणि दुसरीकडे सतत होणारे सिलिंडर स्फोट असे दुहेरी संकट होते. काही धाडसी नागरिकांनी जीवाची पर्वा न करता ५० हून अधिक सिलिंडर नाल्यात फेकून मोठा अनर्थ टाळला.
सुदैवाने ही आग जवळच्या पक्क्या घरांपर्यंत पोहोचली नाही, अन्यथा जीवितहानी अधिक झाली असती. सध्या शेकडो कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून, प्रशासनाकडून मदत आणि नुकसान भरपाईचे काम सुरू आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



