परतवाडा प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा; अमरावतीतील फ्लॅटमध्ये नेऊन अत्याचार केल्याचा आरोप

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे समोर आलेल्या कथित शोषण आणि व्हिडिओ प्रकरणात आता नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे लैंगिक शोषण करण्यात आले आणि त्यानंतर तिचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अहमद अयान याच्यावर आरोप आहे की, तो पीडित मुलींना अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरातील एका नामांकित रेसिडेन्सीमधील फ्लॅटवर घेऊन जात होता. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या रेसिडेन्सीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचा वापर करून आरोपी मुलींना तेथे नेत असे.
धक्कादायक बाब म्हणजे, हा फ्लॅट वापरण्यासाठी आरोपी आपल्या एका मित्राला प्रत्येक वेळी सुमारे ५०० रुपये देत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. पोलिसांना संशय आहे की, या फ्लॅटमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या मुलींना आणले जात होते.
दरम्यान, पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकत एक आरोपी ताब्यात घेतला आहे. या आरोपीने मुख्य आरोपीला फ्लॅट उपलब्ध करून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असून, फ्लॅटमधून काही महत्त्वाचे पुरावेही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणात केवळ मुख्य आरोपीच नव्हे, तर त्याला मदत करणाऱ्या इतर व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे. फ्लॅट उपलब्ध करून देणारा, आरोपीच्या संपर्कात असलेले इतर मित्र, तसेच या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी आरोपींचे मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट, कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहार तपासण्यास सुरुवात केली आहे. तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परतवाडा आणि अमरावती परिसरात या घटनेमुळे संतापाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.



