नाशिक TCS कार्यालयाबाहेर संतप्त नागरिकांची गर्दी; लैंगिक छळ प्रकरणावर १६-१७ एप्रिलला देशव्यापी आंदोलनाची हाक

नाशिकमधील TCS कार्यालयातील कथित लैंगिक छळ आणि जबरदस्तीने धर्मांतराच्या आरोपांमुळे वातावरण अधिकच तापले आहे. १६ आणि १७ एप्रिल रोजी बजरंग दलाने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर नाशिकमधील TCS कार्यालयाबाहेर नागरिक आणि कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली आहे.
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार TCS ने नाशिक युनिटमधील कामकाज तात्पुरते स्थगित केले असून कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येण्यास सांगण्यात आले असून, नाशिक युनिटमधील नव्या भरतीलाही तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणाची सुरुवात नाशिक कार्यालयातील आठ महिला कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ सहकाऱ्यांवर लैंगिक छळ आणि जबरदस्तीने धर्मांतराचा दबाव आणल्याचा आरोप केल्यानंतर झाली. त्यानंतर एकामागून एक तक्रारी समोर येत गेल्या आणि आतापर्यंत नऊ FIR दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना अटक केली असून, विशेष तपास पथक (SIT) संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.
TCS ने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना “झिरो टॉलरन्स” धोरण असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने सांगितले की, चौकशीअंती आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. Tata Sons चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनीही या आरोपांना “अत्यंत गंभीर आणि वेदनादायक” म्हटले असून, कंपनीकडून स्वतंत्र अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.
सध्या नाशिकमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, TCS कार्यालय परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. प्रशासनाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



