सुरक्षिततेचे धडे आता शाळांमध्ये; अमरावती मनपाची शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा!

७० शाळांमधील २,५०० विद्यार्थ्यांची नोंदणी; वाहतूक नियम, सायबर सुरक्षा, प्रथमोपचार आणि आपत्ती व्यवस्थापनाचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
अमरावती : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे सुरक्षिततेचे धडे देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेली वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. वाढते रस्ते अपघात रोखणे, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाला शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत ७० शाळांमधील २ हजार ५०० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. तसेच ८५ नोंदणी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यामध्ये समुपदेशक चंद्रशेखर गुलवाडे, सायबर सेफ्टी सेलचे सदस्य तथा निरीक्षक चंद्रकांत गुल्हाने, विभागीय समादेशक सागरसिंह ठाकूर, मनपा समादेशक योगेश पखाले, वैभव निमकर आणि सुशांत गायकवाड यांचा समावेश होता. त्यांनी वाहतूक सुरक्षा, नागरी संरक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षिततेसंदर्भात विविध महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट केल्या.
कार्यशाळेत आत्मसुरक्षा, रस्ता सुरक्षा, वाहतुकीचे नियम, हेल्मेट वापरण्याचे महत्त्व, अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रथमोपचार, आग विझविण्याच्या पद्धती, जलसुरक्षा, सायबर सुरक्षा आणि आरोग्यदायी जीवनशैली अशा विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. रस्त्यावरून प्रवास करताना पादचारी, सायकलस्वार आणि वाहनचालकांनी घ्यावयाची काळजी, अपघात घडल्यास जखमींना तातडीने मदत करण्याची पद्धत तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्वतःसह इतरांचे संरक्षण कसे करावे, याचे उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले.
विशेष म्हणजे, शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत सुरक्षिततेचे ज्ञान पोहोचविण्याची संकल्पना या उपक्रमात राबविण्यात येत आहे. त्यामुळे शालेय स्तरावरच वाहतूक नियमांचे पालन, सामाजिक जबाबदारी, स्वसंरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनाचे संस्कार रुजविण्यास मदत होणार आहे.
मनपा आयुक्त मंगेश गोंदावले, शिक्षण सभापती ॲड. प्रीतीताई रेवणे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विशेष कौतुक केले.
कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सल्लागार प्रशांत नालसे, चित्रा खोब्रागडे, आरएसपी अधिकारी अजय शर्मा, मोहम्मद मुजाहिद, मोहम्मद मुजम्मील, शिरीष फसाटे, हाफिज खान, प्रज्ञा ढंगारे, माधुरी बिजवे, मनीषा घाटे आणि वनमाला भास्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिक्षणासोबतच सुरक्षिततेचे संस्कार देणारा हा उपक्रम अमरावती महानगरपालिकेच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. शिक्षकांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रशिक्षण पोहोचल्यास भविष्यात जबाबदार, सजग आणि सुरक्षित नागरिक घडविण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
चौकट : पुस्तकी ज्ञानासोबत जीवनोपयोगी कौशल्येही आवश्यक!
“मुलांना शालेय जीवनातच वाढते रस्ते अपघात रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रशिक्षण देणे, समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासंदर्भात जागरूक करणे आणि भविष्यातील सुजाण, जबाबदार व सुरक्षित नागरिक घडविणे हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. आजच्या काळात केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारे ज्ञान व कौशल्ये देणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम शिक्षकांना प्रशिक्षित करून त्यांच्या माध्यमातून हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.”
— डॉ. प्रकाश मेश्राम, शिक्षणाधिकारी, अमरावती महानगरपालिका



