नागपुरात बनावट नंबर प्लेटचा वापर करून हायड्रा क्रेनचा व्यवसाय; गुन्हे शाखेची कारवाई

कपिलनगर परिसरातून २० लाखांच्या तीन हायड्रा क्रेन जप्त; वाहन नोंदणी आणि मालकी हस्तांतरणातील नियमांचे उल्लंघन उघड
नागपूर : वाहनांच्या बनावट नोंदणी क्रमांकाचा वापर करून शासनाची दिशाभूल करत हायड्रा क्रेनचा व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ ने कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत तब्बल २० लाख रुपये किमतीच्या तीन हायड्रा क्रेन जप्त केल्या आहेत. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ ते ४.२० वाजेदरम्यान कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माउंट लिटेरा शाळेजवळील प्लॉट क्रमांक २०४ येथे ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित हायड्रा क्रेनच्या नोंदणीसंदर्भात गंभीर अनियमितता आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींकडे वाहनांची वैध नोंदणी नसताना क्रेनचा वापर केला जात होता. तसेच वाहनांच्या मालकी हस्तांतरणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. एका वाहनाचा नोंदणी क्रमांक दुसऱ्या वाहनावर वापरून बनावट नोंदणी क्रमांक तयार करण्यात आल्याचा संशय आहे. हा क्रमांक वैध असल्याचे भासवून संबंधित क्रेनचा स्वतःच्या व्यावसायिक कामासाठी वापर केला जात होता. या माध्यमातून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या कारवाईत पोलिसांनी इंडो फार्म कंपनीची अंदाजे ८ लाख रुपये किमतीची हायड्रा क्रेन, ॲक्शन कन्स्ट्रक्शन कंपनीची अंदाजे ८ लाख रुपये किमतीची हायड्रा क्रेन आणि स्टॅंडर्ड कंपनीची अंदाजे ४ लाख रुपये किमतीची हायड्रा क्रेन जप्त केली. अशा एकूण २० लाख रुपये किमतीच्या तीन क्रेन पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
या प्रकरणात फिरोज आलम वर्ल्ड अजगर हुसेन (वय २६, रा. यशोधरानगर, एनआयटी कॉटन, नागपूर) याचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले असून, अजगर हुसेन (वय २६, रा. यशोधरानगर, नागपूर) हा अन्य पाहिजे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 318(2), 336(3), 340(2), 345(2)(3), 3(5) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या तीनही क्रेन आणि संबंधित कागदपत्रे पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ च्या पथकाने केली असून, वाहनांच्या बनावट नोंदणी क्रमांकाचा वापर करून सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपीचा शोध आणि वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.



