Uncategorized

“अकोल्यात खळबळ! अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा |

अकोला : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या स्टोन क्रशर व्यावसायिक आणि प्रशासनातील वादाला मोठं वळण लागलं आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा नोंद होताच त्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणात गुन्हा क्रमांक 270/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 308 (2), 351 (1) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (PCA) कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टोन क्रशर उद्योजक विवेक प्रभाकर बिजवे (वय 62) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, 19 मार्च 2026 रोजी बार्शी टाकळी परिसरातील त्यांच्या स्टोन क्रशरजवळ आरोपी प्रमोद गायकवाड यांनी 15,000 रुपयांची खंडणी मागितली. तसेच इतर व्यावसायिकांकडूनही अशीच मागणी केल्याचा आरोप आहे. “पैसे दिले नाहीत तर व्यवसाय बंद पाडू,” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. भीतीपोटी तक्रारदाराने शासकीय निवासस्थानी जाऊन 15 हजार रुपये दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

यानंतर 1 एप्रिल 2026 रोजी फोनवरून पुन्हा धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात एक ऑडिओ क्लिपही पुरावा म्हणून सादर करण्यात आली आहे. तब्बल 9 दिवसांच्या चौकशीनंतर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होताच राज्य सरकारने तत्काळ कारवाई करत प्रमोद गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार का, याकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, प्रमोद गायकवाड यांनी सर्व आरोप फेटाळले असून, आपण केवळ रॉयल्टी वसुलीसाठी दबाव टाकत होतो, असा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button