बडनेरात आंबेडकर जयंतीचा जल्लोष; समता चौकात भव्य तयारीला वेग

बडनेरा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बडनेरा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, समता चौक परिसरात सध्या जल्लोषाची तयारी सुरू आहे. यंदाचा जयंती उत्सव भव्य, आकर्षक आणि लक्षवेधी करण्यासाठी डॉ. आंबेडकर पुतळा स्मारक समितीकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
सध्या समता चौक परिसरात रंगरंगोटी, स्वच्छता आणि आकर्षक होर्डिंग्स व बॅनर्स लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परिसरातील प्रत्येक कोपरा सजवण्यात येत असून, वातावरणात सणासुदीची झलक पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काहीतरी वेगळं आणि खास करण्याचा समितीचा प्रयत्न आहे.
यंदाच्या जयंतीनिमित्त २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रीय समाज प्रबोधनकार पवन महाराज दवंडे यांच्या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये आणि सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी या तयारीची माहिती दिली. तसेच प्रमुख मार्गदर्शक लाईकभाई पटेल, उपाध्यक्ष अशोक नंदागवळी, कोषाध्यक्ष मधुकर साखरे यांच्यासह मच्छिंद्र भटकर, पप्पूभाऊ गडलिंग, सुशील बोरकर आणि इतर कार्यकर्ते हा उत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
बडनेरात सुरू असलेली ही तयारी पाहता, यंदाची आंबेडकर जयंती भव्य, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरणार, हे निश्चित मानले जात आहे.



