पुसदमध्ये महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रबोधनपर व्याख्यान; “धर्म जोडण्यासाठी, विभाजनासाठी नाही” – प्रा. कुरेशी

यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रम उत्साहात पार पडला. या व्याख्यानातून समाजाला विचार करायला लावणारा ठोस संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमात नागपूरचे प्रा. जावेद पाशा कुरेशी यांनी धर्म, समाज, शिक्षण आणि राजकारण यावर सखोल मार्गदर्शन केले. “धर्म माणसाला जोडण्यासाठी आहे, विभाजनासाठी नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी धर्माच्या नावावर निर्माण होणाऱ्या तणावावर टीका केली.
“सांस्कृतिक संघर्ष हा मानवतेच्या मानगुटीवर बसलेला राक्षस आहे,” असे स्पष्ट वक्तव्य करत त्यांनी समाजात समता आणि बंधुतेची गरज अधोरेखित केली. शिक्षणाच्या महत्त्वावर बोलताना त्यांनी महात्मा फुले यांचा विचार मांडत “शिक्षण हाच खरा धर्म आहे,” असे नमूद केले.
सत्यशोधक चळवळीमुळे समाजात समता आणि बंधुता निर्माण झाली, असे सांगत त्यांनी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या स्त्री शिक्षणातील योगदानावरही प्रकाश टाकला.
राजकारणावर भाष्य करताना त्यांनी नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले. “राजकारण तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतं,” असे ते म्हणाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत सामाजिक न्यायाची परंपरा त्यांनी अधोरेखित केली.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानामुळे उपस्थितांमध्ये सामाजिक जागृती निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
धर्म, शिक्षण आणि सामाजिक समतेवर दिलेला हा संदेश आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, पुसद येथील या कार्यक्रमातून समाजाला सकारात्मक दिशा देणारा विचार मिळाला आहे.



