AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत मध्यरात्री रक्तरंजित हल्ला; २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, शहरात भीतीचे वातावरण

अमरावती : शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीत प्रवीण नगर परिसरात मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या घटनेने शहर हादरले आहे.

मृत तरुणाचे नाव संतोष उर्फ राजू बन (वय २२, रा. कपिलवस्तू नगर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून ५ ते ७ हल्लेखोरांनी सापळा रचत संतोषवर अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला गंभीर जखमी करण्यात आले.

गंभीर अवस्थेत संतोषला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

धक्कादायक बाब म्हणजे, याच संतोषवर सुमारे सहा महिन्यांपूर्वीही जीवघेणा हल्ला झाला होता. त्या वेळी पोलिसांनी कठोर कारवाई न करता तडजोडीचा मार्ग अवलंबल्याची चर्चा होती. याच निष्क्रियतेचा फायदा घेत आरोपींनी पुन्हा सूड उगवला, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, घटनास्थळावरून एक संशयित दुचाकी जप्त करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, अमरावतीत वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या खून आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

जुन्या वादातून झालेली ही हत्या पोलिसांच्या निष्क्रियतेचा परिणाम आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न — अमरावतीत सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button