सुरांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे ९२ व्या वर्षी निधन

भारतीय संगीतविश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या मधुर आणि अजरामर आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांनी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात येथे अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्यावर उद्या शिवाजी पार्क येथे सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत २० पेक्षा अधिक भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाणी गाऊन विक्रम केला. त्यांच्या नावावर सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा मानही आहे. त्यांच्या आवाजाने हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती आणि इतर भाषांमधील असंख्य गाणी अमर झाली.
त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ही कधीही न भरून न निघणारी हानी असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. मात्र त्यांच्या सुरेल आठवणी आणि गाणी कायम रसिकांच्या मनात जिवंत राहतील.



