बडनेरात घाणीचा विळखा; कुरेशी नगरमध्ये नागरिकांचा संताप, प्रशासनावर गंभीर आरोप

अमरावती : प्रशासकीय काळात कोलमडलेली स्वच्छता व्यवस्था सुधारेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र आता लोकप्रतिनिधी सत्तेत आल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने बडनेरा उपनगरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
बडनेरा झोन क्रमांक ४ अंतर्गत प्रभाग २२ मधील कुरेशी नगर परिसरात सध्या अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आझाद मंडळ मैदानाजवळील नाले अनेक महिन्यांपासून साफ न केल्यामुळे तुडुंब भरले असून, साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला असून, डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिकांचा आरोप आहे की, सफाई कर्मचारी केवळ वरवर साफसफाई करून फोटो काढतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीचा अहवाल देतात. प्रत्यक्षात मात्र परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
याशिवाय, म्हाडा कॉलनीलगतच्या मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांनंतर उरलेले अन्न आणि पत्रावळ्या रस्त्यावरच टाकल्या जात असल्याने घाणीची समस्या अधिकच गंभीर झाली आहे. परिणामी परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही मनपा प्रशासन आणि कंत्राटदारांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काहींच्या मते, संबंधितांमधील कथित ‘दिलजमाई’मुळे हा प्रश्न कायम प्रलंबित राहिला आहे.
बडनेरातील ही समस्या केवळ एका परिसरापुरती मर्यादित नसून, शहरातील अनेक भागांतून अशाच तक्रारी समोर येत आहेत.
दरम्यान, ‘सिटी न्यूज’कडून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला जाणार असून, नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.



