BuldhanacitynewsLatest NewsLocal NewsMaharashtra

धाडमध्ये हृदयद्रावक घटना! अन्नातून विषबाधा होऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू — कुटुंबावर दुःखाचा डोंगर

बुलढाणा जिल्ह्यातील धाड परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. एका कुटुंबातील पाच जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने तीन निष्पाप चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद वसीम जमदार यांच्या कुटुंबातील आई अफरीन, तीन मुली आणि एक मुलगा यांना रविवारी अचानक पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडत असल्याने सोमवारी सकाळी सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान ४ वर्षांचा मोहम्मद अली आणि ७ वर्षांची म्हशीरा यांचा मृत्यू झाला. आई अफरीन, ८ वर्षांची फातिमा आणि ३ वर्षांची अश्मिरा यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आले. पण दुर्दैवाने, उपचार सुरू असतानाच ८ वर्षांच्या फातिमानेही प्राण सोडले.

सध्या आई अफरीन आणि ३ वर्षांची अश्मिरा यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ही घटना अन्नातून विषबाधेमुळे घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेने संपूर्ण धाड गावासह बुलढाणा जिल्हा हादरला आहे. आपल्या घरातील अन्न स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

तीन निष्पाप चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे जमदार कुटुंबाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. एका वडिलांवर स्वतःच्या लेकरांना खांदा देण्याची वेळ येणे, ही अतिशय वेदनादायक बाब आहे.

पाहत राहा — सिटी न्यूज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button