नांदेडमध्ये महाप्रसादातून विषबाधा! कावलगुड्यात १५० हून अधिक भाविक आजारी — गावात खळबळ

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील कावलगुडा येथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान महाप्रसादातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल १५० हून अधिक भाविकांना त्रास झाल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कावलगुडा गावात धार्मिक उत्सवानिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी वरण-भात, भाजी, पोळी आणि विशेषतः खिरीचा महाप्रसाद भाविकांना देण्यात आला. मात्र, हा प्रसाद सेवन केल्यानंतर काही वेळातच अनेकांना मळमळ, उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते कैलास गोरठेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सर्व रुग्णांना उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. रुग्णांची संख्या मोठी असल्याने रुग्णालयात जागा अपुरी पडली, त्यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून खासगी मंगल कार्यालयात उपचार सुरू करण्यात आले.
दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य अधिकारी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
🗣️ आरोग्य अधिकारी शिलेदार म्हणाले:
“रुग्णांची स्थिती नियंत्रणात आहे. आवश्यक ते सर्व उपचार सुरू आहेत.”
🗣️ सामाजिक कार्यकर्ते कैलास गोरठेकर म्हणाले:
“घटनेचे गांभीर्य ओळखून आम्ही तात्काळ रुग्णांना हलवले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.”
या प्रकरणी महाप्रसादातून विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याचा तपास सुरू असून अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने भाविक आजारी पडल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे.
📺 ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा — सिटी न्यूज



