अमरावतीत स्वच्छतेवर महापौरांचा ‘अॅक्शन मोड’! विलासनगर–मोरबागमध्ये अचानक पाहणी, तात्काळ कारवाईचे आदेश

अमरावती शहरातील स्वच्छता आणि नागरी सुविधांच्या प्रश्नावर आता महापौर थेट अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधील विलासनगर–मोरबाग परिसरात अचानक पाहणी करत नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी इतवारा बाजार परिसरातील अंडा गली आणि गन्ना गली येथे भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी अस्वच्छता, साचलेले पाणी, नाल्यांची दुरवस्था आणि खराब रस्ते या गंभीर समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या. स्थानिक नागरिकांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पी.डब्ल्यू.डी. विभागाचे अभियंता श्री. महल्ले यांना घटनास्थळी बोलावून त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसराची सविस्तर पाहणी करण्यात आली. त्यानंतर आवश्यक दुरुस्ती कामांसाठी त्वरित आराखडा तयार करून कामे विलंब न करता सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
महापौरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर मिळणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि यामध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. तसेच स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नाही, तर नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत सर्वांनी मिळून शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
या पाहणीदरम्यान नगरसेवक, संबंधित अधिकारी आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📺 अमरावतीत स्वच्छतेच्या मुद्द्यावर महापौरांनी घेतलेली ही थेट अॅक्शन… आता दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी किती वेगाने होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे… पाहत राहा — सिटी न्यूज



