BhandaracitynewsLatest NewsMaharashtra

सरांडी आरोग्य केंद्राचा बोजवारा; ३९ गावांचे आरोग्य धोक्यात

भंडारा : लाखांदूर तालुक्यातील सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पूर्णपणे कोलमडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तब्बल ३९ गावांचा आरोग्य भार असलेल्या या केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठी परवड होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची सतत अनुपस्थिती, अपुरी सेवा आणि ढिसाळ व्यवस्थापन यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. परिणामी, रुग्णांना भंडारा, नागपूर किंवा लाखांदूर येथे उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे.

यामुळे विशेषतः गरीब रुग्णांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसत असून, वेळेअभावी अनेकांना हाल सहन करावे लागत आहेत.

स्वच्छतेची दयनीय अवस्था
आरोग्य केंद्रातील स्वच्छतेची स्थिती अत्यंत चिंताजनक असून प्रसाधनगृहात प्रचंड घाण साचलेली आहे. दुर्गंधीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, स्वच्छतागृहात नळ बसवले असले तरी त्यात पाणीच नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह
शासनाकडून निधी उपलब्ध होऊनही सुविधांचा अभाव असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार याबाबत कळवूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

आंदोलनाचा इशारा
परिस्थिती तात्काळ सुधारली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. “हे आरोग्य केंद्र आहे की केवळ दिखावा?” असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.

सरांडी आरोग्य केंद्राची ही अवस्था केवळ चिंताजनक नाही, तर धोकादायक ठरत आहे. आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, की ३९ गावांच्या आरोग्याशी असाच खेळ सुरू राहणार, हा प्रश्न कायम आहे.

ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा – City News

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button