नागपुरात भोंदू बाबाचा पर्दाफाश; ‘पती शोधून देतो’ म्हणत महिलेवर अत्याचार

नागपूर : शहरात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पतीचा शोध लावून देण्याचे आमिष दाखवत एका भोंदू बाबाने महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा भोंदूगिरीचा काळा चेहरा उघड झाला आहे.
ही घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ताहीर रशीद बेग (वय ६५, रा. अंजनगाव) असे आरोपीचे नाव असून, तो स्वतःला तांत्रिक (मांत्रिक) म्हणून ओळख करून देत होता. पीडित महिला ३३ वर्षीय असून, ती घरकाम करून उदरनिर्वाह करते.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी महिलेचा पती बेपत्ता झाला होता. काही दिवसांनी तो मध्यप्रदेशात सापडला, मात्र ३० ऑक्टोबर रोजी पुन्हा गायब झाला. पतीच्या शोधात असताना एका लग्नसमारंभात तिची आरोपीशी ओळख झाली.
आरोपीने “तुमचा नवरा मी शोधून आणतो” असे सांगत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तो महिलेच्या घरी जाऊन तांत्रिक पूजेचा बहाणा करू लागला. घरातील सदस्यांना एका ठिकाणी बसवून दिवा आणि अगरबत्तीच्या माध्यमातून “दिव्यात नवऱ्याची छबी दिसेल” असा भ्रम निर्माण केला.
यानंतर आरोपीने महिलेचा विश्वास जिंकत तिला घराच्या वरच्या मजल्यावर नेले आणि “मांत्रिक विधी” करण्याच्या नावाखाली तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
घटनेनंतर पीडित महिलेने आपल्या नातेवाईकांना सर्व प्रकार सांगितला. त्यांच्या मदतीने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपी ताहीर बेगला अटक केली आहे.
अजूनही बळींची शक्यता
या आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे इतर महिलांना फसवले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, पुढील तपास सुरू आहे.
सतर्क राहण्याचे आवाहन
अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकून गंभीर गुन्हे घडत असल्याने नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा – City News



