Crime NewsLatest NewsNagpur

दोसर भवन चौकात स्फोटकांचा साठा सापडला; नागपुरात खळबळ

नागपूर शहरातील गणेशपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील गजबजलेल्या दोसर भवन चौक परिसरात मंगळवारी (दि. ७) एक मोठी धक्कादायक घटना उघडकीस आली. लांजेवार यांच्या इमारतीच्या ओपन स्पेसमध्ये संशयास्पद पिशवी आढळून आली असून त्यात तब्बल 58 डिटोनेटर आणि 15 जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही बाब लक्षात येताच तात्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथक, तसेच मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. परिसर पूर्णपणे सुरक्षित करण्यात आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घरमालकाने दिलेल्या माहितीनुसार, ही पिशवी आपल्या जागेत असल्याची माहिती त्यांना आजच मिळाली. त्यामुळे हा स्फोटकांचा साठा नेमका कुठून आला, कोणी आणून ठेवला आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.

घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल आणि पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच PESO (Petroleum and Explosives Safety Organization) आणि बॉम्बशोधक पथकाकडून सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी याच सुमारास महाल गांधीगेट परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत. जवळच संघ मुख्यालय आणि मोमीनपुरा परिसर असल्याने संवेदनशीलतेचा मुद्दा अधिकच वाढला आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, “सध्या कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही. सर्व बाजूंनी तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येईल.”

सध्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button