AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत दरोडा प्रकरणाचा जलद उलगडा; ४८ तासांत ७ आरोपी अटकेत, १ कोटींचा मुद्देमाल परत

अमरावती : शहरातील गाडगेनगर परिसरात सराफा व्यापाऱ्यावर झालेल्या थरारक दरोडा प्रकरणात पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या ४८ तासांत ७ आरोपींना अटक केली. या कारवाईत जप्त केलेला तब्बल १ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार आज फिर्यादीला परत करण्यात आला.

ही घटना १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती. फिर्यादी सुशांत शेरेकर हे “सुमित्रा ज्वेलर्स” दुकान बंद करून मोपेडवरून घरी जात असताना, त्यांच्या डिकीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती. यावेळी मागून आलेल्या काळ्या रंगाच्या कारने त्यांची गाडी अडवली.

कारमधून उतरलेल्या तिघांनी शेरेकर यांना ढकलून पाडत चाकूचा धाक दाखवला आणि मोपेडची चावी हिसकावून डिकीत ठेवलेली सोन्याची पिशवी लंपास केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत तांत्रिक माहिती व सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या ४८ तासांत ७ आरोपींना अटक केली. यामध्ये ५ आरोपी कारमधून तर २ आरोपी मोटरसायकलवरून रेकी करत असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे:
👉 ६६१.०३० ग्रॅम सोन्याचे दागिने
👉 १ लाख १९ हजार रुपये रोख
👉 कार आणि मोटरसायकल
👉 ७ मोबाईल फोन
👉 ३ चाकू

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी १२ लाखांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. यापैकी १ कोटी ३४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल ७ एप्रिल २०२६ रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीला परत करण्यात आला.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेनगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केली.

पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
अवघ्या ४८ तासांत आरोपींची अटक आणि कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत करून परत देण्याची ही कारवाई अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उदाहरण ठरत आहे.

ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा – City News

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button