अमरावतीत ‘जनगणना २०२७’ची जोरदार तयारी; फिल्ड ट्रेनर्स प्रशिक्षणाला सुरुवात

अमरावती : शहराच्या विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘जनगणना २०२७’च्या तयारीला आता वेग आला असून, अमरावती महानगरपालिका क्षेत्रात फिल्ड ट्रेनर्ससाठी तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराला आज शानदार सुरुवात झाली.
महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी वर्षा लढ्ढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त योगेश पिठे, जिल्हा समन्वयक ऋषिकेश पाथरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना आयुक्त वर्षा लढ्ढा म्हणाल्या की, जनगणना ही केवळ आकडेवारी नसून देशाच्या भविष्यातील धोरणांची पायाभरणी आहे. त्यामुळे माहिती संकलन करताना पारदर्शकता आणि अचूकता राखणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची राष्ट्रीय जबाबदारी आहे.
या तीन दिवसीय प्रशिक्षणात फिल्ड ट्रेनर्सना डिजिटल साधनांचा वापर, डेटा संकलन प्रक्रिया, नोंदणी पद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. हे प्रशिक्षित अधिकारी पुढे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देऊन संपूर्ण यंत्रणा सक्षम करतील.
अचूकता आणि वेळेवर भर
जनगणनेच्या प्रक्रियेत तांत्रिक अचूकता आणि वेळेचे नियोजन यावर विशेष भर दिला जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून अचूक माहिती गोळा करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
‘जनगणना २०२७’ यशस्वी करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार असून, यामुळे शहराच्या विकास नियोजनाला ठोस दिशा मिळणार आहे.
अमरावतीतील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा – City News



