14 वर्षांच्या मुलाचा अपहरणानंतर खून प्रकरण, 3 आरोपी अटक

नागपूरमधील गिट्टीखदान परिसरात राहणारा अथर्व दिलीप नानोरे, वय अवघं १४ वर्ष २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी झाला. पण रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला आणि दुसऱ्याच दिवशी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. तपास सुरू असतानाच ४ एप्रिलला एक धक्कादायक माहिती समोर आली. भरतवाडा रेल्वे क्रॉसिंगजवळ एका अनोळखी मुलाचा मृतदेह आढळला, नातेवाईकांनी ओळख पटवली तो मृतदेह अथर्वचाच होता!
प्राथमिक तपासात समोर आलं की, त्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता, यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची कलमे वाढवून तपासाची गती वाढवली. सायबर टीम, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे जय रामगोपाल यादव या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न पण पोलिसी चौकशीत अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जय यादवने त्याचे साथीदार केतन उर्फ कुणाल साहू आणि आयुष साहू यांच्यासोबत कट रचला होता.
हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत अथर्वचं अपहरण करण्यात आलं, उद्देश होता – वडिलांकडून खंडणी उकळणे. पण मुलगा ओरडू लागल्याने आरोपींनी त्याचा गळा आवळून खून केला. यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून भरतवाडा रेल्वे पुलावर फेकण्यात आला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.



