5 दिवस जंगलात हरवलेला तरुण जिवंत सापडला

नागपूर जिल्ह्यातील देवलापार परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. रामटेक तालुक्यातील बेलदा येथील रहिवासी, ३२ वर्षीय अरुण राधेश्याम तांदूळकर हा १ एप्रिल रोजी सकाळी घरातून बाहेर पडला, पण त्यानंतर तो परतलाच नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीच पत्ता लागला नाही. अखेर पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली.
दिवस-रात्र सुरू असलेल्या या शोधकार्यात पाच दिवस उलटून गेले. पण अरुणचा काहीच मागमूस नव्हता. अखेर ५ एप्रिल रोजी या मोहिमेला यश मिळालं. दाट जंगलाच्या आत खोल भागात झाडाखाली बसलेल्या अवस्थेत अरुण जिवंत आढळून आला! तो अत्यंत थकलेला आणि उपाशी होता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो शुद्धीत होता. या पाच दिवसांत त्याने कोणतंही अन्न घेतलं नव्हतं. भूक, थकवा, अंधार आणि वन्यप्राण्यांचा सततचा धोका या सगळ्यांशी झुंज देत त्याने आपल्या जीवासाठी लढा दिला. शोधपथकाने तात्काळ त्याला बाहेर काढून देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेनंतर कुटुंबीय भावूक झाले असून त्यांनी देवाचे आणि शोधपथकाचे आभार मानले आहेत. परिसरात या चमत्कारिक बचावकथेची जोरदार चर्चा सुरू आहे. खरंच… “देव तारी त्याला कोण मारी” याची प्रचिती देणारी ही घटना ठरली आहे.



