नागपुरात हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष! रविनगरच्या संकट मोचन मंदिरात भक्तीचा महासागर उसळला

नागपूर | प्रतिनिधी
पवनपुत्र हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने नागपुरात सर्वत्र भक्ती, शक्ती आणि श्रद्धेचा संगम पाहायला मिळाला. रविनगर येथील प्रसिद्ध श्री संकट मोचन हनुमान मंदिरात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक उत्सवाचा आज मुख्य दिवस मोठ्या उत्साहात पार पडला.
१९ मार्चपासून सुरू झालेल्या या भक्ती सोहळ्यात ध्वज पूजन, रामायण पाठ, रामनवमी महोत्सव, हनुमान चालीसा पठण तसेच श्री हनुमान लघु रुद्र अभिषेक अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.
आज, २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिरात विधीवत पूजा, महाआरती आणि होम-हवन पार पडले. सुंदरकांड पाठाने वातावरणात विशेष चैतन्य निर्माण केले होते. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
‘जय श्रीराम’ आणि ‘बजरंग बली की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.
श्रद्धा, शिस्तबद्ध नियोजन आणि उत्साहाच्या वातावरणात रविनगरमधील हा जन्मोत्सव सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला. भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि भक्तीमुळे संकट मोचन हनुमानाप्रती असलेली अढळ श्रद्धा अधोरेखित झाली.



