कारंजा लाड तालुक्यात वादळाचा कहर! बांबर्डा मुंदे गावात घरांची छपरे उडाली, लाखोंचं नुकसान

कारंजा लाड | प्रतिनिधी
कारंजा लाड तालुक्यातील बांबर्डा मुंदे गावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल रात्री आलेल्या वादळी पावसाने गावाला अक्षरशः झोडपून काढत मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार वादळासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की नागरिकांना घराबाहेर उभं राहणंही कठीण झालं.
या वादळात अनेक घरांवरील टीनची पत्रे हवेत उडून गेली. काही ठिकाणी घरांच्या छपरांसह आतील पंखे देखील निखळून पडल्याची माहिती समोर आली आहे. वाऱ्याच्या तडाख्यामुळे घरांतील अन्नधान्य, कपडे आणि इतर साहित्य पूर्णपणे भिजून खराब झाले आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मालमत्तेचं नुकसान लाखोंच्या घरात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आपत्तीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.
दरम्यान, बाधित नागरिकांनी महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनानेही या घटनेची दखल घेऊन लवकरात लवकर मदतकार्य सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



