अमरावतीत अद्भुत परंपरा! बैलांशिवाय १० गाड्या ओढल्या; जळका (पटाचे) येथे हनुमान जयंतीला भक्तीचा महासागर

अमरावती | प्रतिनिधी
विज्ञानाच्या युगातही श्रद्धेचा प्रभाव कायम असल्याचं प्रत्यंतर अमरावती जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे तालुक्यातील जळका (पटाचे) येथे पाहायला मिळालं. हनुमान जयंतीच्या निमित्ताने येथे पारंपरिक ‘गाड्या ओढण्याचा’ थरारक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे १० पेक्षा अधिक बंडीगाड्या एकमेकांना साखळीने जोडून त्यावर २५ ते ३० भाविक बसवले जातात. विशेष म्हणजे, या गाड्या ओढण्यासाठी बैल किंवा कोणतीही यंत्रसामग्री वापरली जात नाही. तरीही या गाड्या पुढे सरकत असल्याचा अनुभव उपस्थितांना येतो.
गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार, भगत श्री पंडित दामाजी कंगाले यांच्या अंगात देवीचा संचार होतो आणि त्यांच्या स्पर्शाने किंवा उपस्थितीनेच या जड गाड्या चालू लागतात. अनेक पिढ्यांपासून सुरू असलेली ही परंपरा पाहण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक जळका (पटाचे) येथे दाखल होतात.
श्री लक्ष्मी माता आणि तेलंगा माता यांच्या साक्षीने पार पडणारा हा सोहळा केवळ धार्मिक नसून सामाजिक एकतेचा संदेश देणारा ठरतो. यंदाही हा उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा झाला.
उत्सवाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. मात्र, या अनोख्या परंपरेची आणि ‘चमत्काराची’ चर्चा संपूर्ण परिसरात रंगली असून श्रद्धा आणि परंपरेचा संगम पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.



