नागपुरात गुन्हे तपासाला वेग! नंदनवन पोलिसांची आरोपींच्या घरी झडती; महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त

नागपूर | प्रतिनिधी
नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंद असलेल्या एका गंभीर गुन्ह्याच्या तपासाला वेग आला असून पोलिसांनी आज तिन्ही आरोपींच्या राहत्या घरांवर झडती मोहीम राबवत महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वैभव अशोक तंन्यलवार, संकेत गुलाबराव वंजारी आणि तुषार दिलीप पळसापुरे यांच्याविरोधात तपास सुरू असून, तपासाच्या अनुषंगाने त्यांच्या घरी झडती घेण्यात आली.
विशेष म्हणजे, ईद-उल-फितर (रमजान ईद) निमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही उपलब्ध मनुष्यबळ मर्यादित होते. अशा परिस्थितीत महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
झडतीदरम्यान पंचांच्या उपस्थितीत चालणी पंचनामा करण्यात आला असून आरोपींशी संबंधित महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. या संपूर्ण कारवाईची नोंद पोलीस स्टेशनच्या डायरीत करण्यात आली आहे.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



