citynewsCrime NewsLatest NewsLocal NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात नंदनवन पोलिसांची धडक कारवाई! चोरीप्रकरणी ३ आरोपी अटकेत; १.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमाल आणि वाहन असा एकूण १ लाख ९ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विपीन अनिलराव बंडीवार हे खासगी कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत असून के.डी.के. टी-पॉईंट येथील उड्डाणपुलाच्या कामावर देखरेख करत होते. ३० मार्च रोजी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास त्यांनी साइटवरील लोखंडी कंटेनरची पाहणी केली असता, त्यामधील वेल्डिंग मशीन, कटर मशीन, केबल्स व इतर साहित्य असा सुमारे ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे उघड झाले.

या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, तपास सुरू असताना पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना के.डी.के. टी-पॉईंटजवळील मोकळ्या मैदानात तीन संशयित व्यक्ती आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सैय्यद साहिल सैय्यद जलाल, साहिल अली मुस्ताक अली उर्फ गुज्जर आणि शहबाज खान शेर खान अशी आहेत. आरोपींनी कंटेनरमधील साहित्य चोरी करण्यासोबतच श्रीकृष्णनगर चौक परिसरातून एक अॅक्टीवा दुचाकी चोरी केल्याचीही कबुली दिली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून एकूण १ लाख ९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल आणि दुचाकी जप्त केली असून या कारवाईमुळे दोन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

नंदनवन पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारीवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button