Crime NewsLatest News

कांद्याच्या बियाण्यात घोटाळा! शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक

बुरहानपूर जिल्ह्यातील पातोंडा गावातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा रब्बी हंगाम धक्कादायक ठरला आहे. गावरान लाल कांद्याचे बियाणे म्हणून खरेदी केलेल्या बियाण्यांमधून प्रत्यक्षात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन निघाल्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पातोंडा येथील शेतकरी कृष्णा गोविंदा महाजन यांनी सोलापूर परिसरातील शेतकऱ्यांकडून गावरान लाल कांद्याचे बियाणे खरेदी केले होते. त्यानंतर त्यांनी योग्य पद्धतीने शेती मशागत करून कांद्याची लागवड केली. औषध फवारणी, खतांचा वापर आणि सर्व शेती प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली.

सुरुवातीला पीक चांगल्या अवस्थेत दिसत होते. मात्र कांदा मोठा होऊ लागल्यावर त्याचा रंग बदलून पांढरा दिसू लागला. यामुळे बियाण्यात भेसळ असल्याचा संशय शेतकऱ्यांना आला. तपासाअंती गावरान लाल कांद्याच्या बियाण्यात इतर बियाणे मिसळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांना सुमारे ४० टक्के आर्थिक फटका बसणार असल्याचे कृष्णा गोविंदा महाजन यांनी सांगितले. विशेष म्हणजे ही बियाणे थेट शेतकऱ्यांकडूनच खरेदी करण्यात आली होती, त्यामुळे ‘शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांची फसवणूक केली’ अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत.

बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना होणारा तोटा ही गंभीर बाब असून प्रशासनाने याची दखल घेऊन कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button