भंडारा येथे धान गिरणीमुळे गंभीर प्रदूषण!

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पाऊणगावात सध्या प्रदूषणाचा कहर पाहायला मिळत आहे. गावातील धान गिरणीतून सतत बाहेर पडणारा काळा धूर, राख आणि सूक्ष्म धूळकण यामुळे संपूर्ण गाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, नागरिकांना स्वतःच्या घरात श्वास घेणंही कठीण झालं आहे. घरात धूर शिरतोय, अंगणात राख साचतेय आणि वातावरण पूर्णपणे दूषित झालं आहे. या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका लहान मुलं, महिला आणि वृद्धांना बसत आहे. खोकला, दम, श्वसनाचे विकार आणि त्वचारोग यांसारख्या आजारांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
फक्त हवा नाही, तर पाणीही दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नदी-नाले प्रदूषित झाले असून जनावरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. शेतीवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ग्रामस्थांनी यापूर्वी प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या, ग्रामपंचायतीने ठरावही मंजूर केला.
मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या सगळ्यात सर्वात संतापजनक बाब म्हणजे गिरणी मालकाची उघड दादागिरी. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं – “सगळ्यांना मॅनेज केलंय, माझं कुणी वाकडं करू शकत नाही!” यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आता ग्रामस्थ आक्रमक झाले असून, तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पाऊणगावातील नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे… प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही, तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही… या प्रकरणात आता प्रशासन काय कारवाई करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



