भानखेडा रोडवर १८ वर्षीय तरुणीवर अत्याचार; आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, आयुक्तांकडे निवेदन

अमरावती शहरातील पोहरा ते भानखेडा मार्गावर २८ मार्च रोजी एका १८ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली असून त्यांना २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजकीय संघटनांनी या घटनेचा निषेध करत आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
२८ मार्च रोजी अमरावतीच्या पोहरा-भानखेडा मार्गावर ही काळीमा फासणारी घटना घडली. एका १८ वर्षीय तरुणीला लक्ष्य करत पाच नराधमांनी हे कृत्य केले. पीडितेच्या तक्रारीनंतर फ्रेजरपुरा पोलिसांनी तातडीने पावले उचलत गुन्हा दाखल केला आणि पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
न्यायालयाने या आरोपींना २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस सध्या त्यांची कसून चौकशी करत आहेत. महिलांशी संबंधित संवेदनशील प्रकरण असल्याने पोलिसांनी तपासात कमालीची गोपनीयता पाळली आहे. १ एप्रिल रोजी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुराव्यांची जमवाजमव केली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या निर्जन मार्गावर अशा अनेक घटना घडतात, मात्र भीतीपोटी कोणी समोर येत नाही. या घटनेनंतर राजकीय संघटनांनीही आक्रमक पवित्रा घेतला असून, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अमरावतीसारख्या शहरात अशा घटना घडणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आता सर्वांचे लक्ष पोलीस तपासाकडे लागले आहे. २ एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर या प्रकरणातील नेमके सत्य आणि आरोपींचे चेहरे समोर येतील. पोलीस या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



