नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याची मोठी उसळी; लग्नसराईत ग्राहकांना झटका

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे घसरलेले दर आता पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहेत. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
इराण-इस्त्राइल तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र, नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजार उघडताच सोन्याने जोरदार उसळी घेतली आहे.
goodreturns संकेतस्थळानुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल ₹१,९७० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही मागील काही दिवसांतील सर्वात मोठी वाढ मानली जात आहे.
आजचे दर पाहता —
- २४ कॅरेट सोनं: ₹१५,१६३ प्रति ग्रॅम
- २२ कॅरेट सोनं: ₹१३,९०० प्रति ग्रॅम
- १८ कॅरेट सोनं: ₹११,३७६ प्रति ग्रॅम
तर तोळ्याच्या दरातही मोठी वाढ दिसून येत आहे. २४ कॅरेट सोनं आता ₹१,५१,६३० प्रति तोळ्यावर पोहोचलं आहे. मुंबई, पुणे, नाशिक, जळगावसह देशातील प्रमुख शहरांमध्ये हेच दर लागू झाले असून सर्वत्र वाढीचा कल दिसून येत आहे. या वाढीमुळे लग्नसराईच्या हंगामात सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या दरात पुढील काही दिवसांतही चढ-उतार सुरू राहू शकतात.
दरम्यान, गुंतवणूकदारांसाठी मात्र सोनं पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.



