नागपूरात ‘ऑपरेशन थंडर 2.0’ अंतर्गत मोठी कारवाई; गांज्यासह दोन आरोपी अटकेत, ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

नागपूर : शहरात अमली पदार्थांविरोधात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने ‘ऑपरेशन थंडर 2.0’ अंतर्गत मोठी कारवाई करत कळमना परिसरातून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एका महिला आरोपीचाही समावेश असून, मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 जानेवारी 2026 रोजी रात्री साडेदहा ते सव्वा अकराच्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे मोहनलाल वाजपेयी नगर परिसरात पोलिसांनी सापळा रचला. यावेळी शातेजकुमार नेकप्रताप शाहू हा आरोपी निळ्या रंगाच्या एक्टिवावर बसलेला आढळला.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 961 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याशिवाय दुचाकी आणि रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण 84 हजार 25 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
आरोपीची चौकशी केली असता त्याने हा गांजा सलोनी रणवीर सिंग चौधरी या महिला आरोपीकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी शांतीनगर परिसरातून संबंधित महिला आरोपीला ताब्यात घेतले.
पुढील चौकशीत फारुख नावाच्या व्यक्तीकडून गांजाचा पुरवठा होत असल्याचे समोर आले असून, त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी कळमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईमुळे नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायावर मोठा आघात बसल्याचे मानले जात असून, पुढील तपासात आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.



