रामटेकला ‘आकाशाची झेप’; खिंडसी जलाशयातून सी-प्लेन सेवा सुरू होण्याच्या मार्गावर

रामटेक : धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेल्या रामटेकच्या पर्यटन विकासाला आता नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. खिंडसी जलाशयातून सी-प्लेन सेवा सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वेग मिळत असून, हा प्रकल्प रामटेकसाठी ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. जलाशयाची खोली, सी-प्लेनच्या टेक-ऑफ व लँडिंगसाठी आवश्यक जागा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा सखोल अभ्यास करण्यात आला. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी खिंडसी परिसराची पाहणी केली.
सी-प्लेन सेवा सुरू झाल्यानंतर नागपूर ते रामटेक हा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होणार असल्याने पर्यटकांसाठी हा मोठा आकर्षण ठरणार आहे. परिणामी, रामटेकमध्ये पर्यटनाची मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, गाईड सेवा, बोटिंग यांसारख्या व्यवसायांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता असून स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
एकूणच, सी-प्लेन प्रकल्पामुळे रामटेकच्या पर्यटनाला नवी ओळख मिळेल का आणि तो खरोखरच ‘गेमचेंजर’ ठरेल का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.



