citynewsJalnaLatest NewsMaharashtra

भोकरदन तालुक्यात बिबट्याचा थरार; पाच तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने केला सुरक्षित बंदोबस्त

जालना (प्रतिनिधी):
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे आज बिबट्याच्या उपस्थितीमुळे मोठा थरार पाहायला मिळाला. शेतात अचानक दिसलेल्या बिबट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाने तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, धावडा येथील गोदरी रोड परिसरात जुनेद सौदागर यांच्या शेतात मक्का कापणीसाठी गेलेल्या मजुरांना आज सकाळी बिबट्या दिसून आला. अचानक बिबट्या दिसल्याने मजुरांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी तत्काळ वनविभागाला याची माहिती दिली.

वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता बिबट्याचा वावर आढळून आला. दरम्यान, हा बिबट्या बाळू देशमुख यांच्या जनावरांच्या चाऱ्याच्या शेतात जाऊन तब्बल पाच तास ठाण मांडून बसला होता. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनविभागाने जालना येथून पिंजरा मागवून रेस्क्यू मोहीम सुरू केली. वनपरिक्षेत्र अधिकारी नीता फुले यांच्या नेतृत्वाखाली वनपरिमंडळ अधिकारी योगेश डोमळे तसेच संपूर्ण पथकाने समन्वयाने कारवाई केली. रेस्क्यू टीमचे आशिष जोशी आणि दीपक वटाणे यांनी अथक प्रयत्न करत बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितरीत्या जेरबंद केले.

अखेर पाच तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. सध्या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू असून परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आहे.

दरम्यान, वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शेतात एकटे जाऊ नये, वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ माहिती द्यावी आणि कोणत्याही अफवा पसरवू नयेत.

“धावडा येथील या घटनेने वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील वाढता संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. मात्र वनविभागाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली,” अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button