Accident NewsAmravaticitynewsLatest NewsMaharashtraWashim

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; मदतीअभावी ट्रक चालकाचा मृत्यू, यंत्रणेवर गंभीर आरोप

अमरावती/कारंजा (प्रतिनिधी):
समृद्धी महामार्गावरून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून, बंद पडलेल्या ट्रकला वेळेत बॅरिकेट न लावल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संबंधित यंत्रणेच्या हलगर्जीपणावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

ही घटना समृद्धी महामार्गावरील लोकेशन क्रमांक १९७ जवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीबी ०५ एपी ९२४२ क्रमांकाचा ट्रक नागपूरहून मुंबईकडे जात असताना रात्री सुमारे २ वाजता त्याच्या डिझेल पाइपला गळती झाली आणि ट्रक १०० किमी वेगाच्या लेनमध्येच बंद पडला.

घटनेनंतर चालकाने तात्काळ समृद्धी महामार्ग हेल्पलाईनला संपर्क साधून बॅरिकेट लावण्याची विनंती केली. मात्र, वारंवार कॉल करूनही घटनास्थळी कोणतीही मदत पोहोचली नाही, असा आरोप आहे. धोकादायक परिस्थितीतही चालकाने स्वतः रस्त्यावर उभं राहून इतर वाहनांना हातवारे करत सावध करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही अपघात टळले.

दरम्यान, पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास एमएच १४ एचयू ३२९२ क्रमांकाचा दुसरा ट्रक कोलकात्याहून मुंबईकडे येत असताना बंद ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला.

घटनास्थळी कारंजा ग्रामीण पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि इतर मदत पथक पोहोचले. मात्र जखमी चालकाला बाहेर काढण्यासाठी क्रेनची आवश्यकता होती. आरोपानुसार, संबंधित ठेकेदाराने क्रेनमध्ये डिझेल नसल्याचे कारण देत ती पाठवण्यास नकार दिला, त्यामुळे मदतकार्य उशिरा सुरू झाले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वेळेत क्रेन उपलब्ध झाली असती तर चालकाचा जीव वाचू शकला असता. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, “ही घटना केवळ अपघात नसून व्यवस्थेच्या हलगर्जीपणाचे गंभीर उदाहरण आहे. वेळेत बॅरिकेट आणि मदत मिळाली असती, तर एक जीव वाचू शकला असता,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button