citynewsLatest NewsMaharashtraNashik

नाशिकमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक; एसीबीची मोठी कारवाई

नाशिक (प्रतिनिधी):
नाशिकमध्ये जीएसटी विभागातील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खाजगी व्यक्तीला २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.

या कारवाईत राज्यकर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे आणि खाजगी व्यक्ती अमित जाधव यांना अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाविरोधातील कारवाईचा तपास पूर्ण करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली होती. नंतर तडजोडीनंतर हा व्यवहार १ कोटी रुपयांवर निश्चित झाला होता.

या व्यवहारातील पहिला हप्ता म्हणून २० लाख रुपये स्वीकारताना एसीबीने सापळा रचून तिन्ही आरोपींना अटक केली. कारवाईदरम्यान सोमनाथ पागे यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता अतिरिक्त २ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.

विशेष म्हणजे, एसीबीने कारवाईपूर्वी कॉल रेकॉर्डिंग आणि लाचेच्या मागणीची खात्री करूनच सापळा रचला होता. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

या घटनेमुळे जीएसटी विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे. लाचलुचपत विरोधात एसीबीची ही मोठी कारवाई मानली जात असून, या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button