पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये महत्त्वाची बैठक; सौदी, इजिप्त आणि तुर्कियेचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादला भेट देणार

इस्लामाबाद (प्रतिनिधी):
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये महत्त्वाच्या राजनैतिक हालचाली सुरू झाल्या आहेत. सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्कियेचे परराष्ट्र मंत्री चर्चेसाठी पाकिस्तानला भेट देणार आहेत.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्या निमंत्रणावरून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सऊद, तुर्कियेचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बद्र अब्देलअत्ती हे २९ आणि ३० मार्च रोजी इस्लामाबादमध्ये उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत पश्चिम आशियातील विशेषतः इराणमधील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर तणाव कमी करण्यासाठी उपाययोजना, तसेच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर व्यापक चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या उच्चस्तरीय बैठकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले असून, पश्चिम आशियातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या चर्चेला महत्त्व दिले जात आहे.



