अमरावती मनपात सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व; चार समित्यांच्या निवडी बिनविरोध

अमरावती :
महानगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला असून चार महत्त्वाच्या समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत. या प्रक्रियेत सत्ताधारी आघाडीचा दबदबा स्पष्टपणे दिसून आला आहे. भाजप, युवा स्वाभिमानी आणि शिंदे गटाने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केल्याचे चित्र आहे.
महानगरपालिकेतील शहर सुधार, शिक्षण, महिला व बालकल्याण आणि विधी या चार प्रमुख समित्यांच्या निवडणुका कोणत्याही संघर्षाशिवाय पार पडल्या. या निवड प्रक्रियेत सत्ताधारी गटाने सर्व पदांवर एकमताने आपले उमेदवार निवडून आणले.
शहर सुधार समितीच्या सभापतीपदी भाजपच्या राधा कुरिल यांची, तर उपसभापतीपदी युवा स्वाभिमानीच्या सुमती ढोके यांची निवड झाली. शिक्षण समितीच्या सभापतीपदी युवा स्वाभिमानीच्या प्रीती रेवणे, तर उपसभापतीपदी भाजपच्या वंदना मडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ममता आवारे, तर उपसभापतीपदी भाजपच्या लता देशमुख यांची निवड करण्यात आली. विधी समितीच्या सभापतीपदी शिंदे गट समर्थित बीएसपी प्रतिनिधीची निवड झाली असून उपसभापतीपदी उभाटा गटाच्या स्नेहा लुल्ला यांची निवड झाली आहे.
दरम्यान, भाजपच्या डॉ. मधुरा कहाळे यांची चारही समित्यांवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून त्यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाचे हे द्योतक मानले जात आहे.
एकूणच, कोणताही वाद किंवा मतदान न होता सत्ताधारी गटाने सर्व पदांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
आता या समित्यांच्या माध्यमातून शहर विकासाला किती गती मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



