अमरावतीत हनुमान जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा; ‘गजराज’ हत्ती ठरणार मुख्य आकर्षण

अमरावती :
शहरात यंदा हनुमान जयंतीनिमित्त भक्तीचा महासागर उसळणार असून ६ एप्रिल २०२६ रोजी भव्य आणि नेत्रदीपक शोभायात्रा काढण्यात येणार आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या या मिरवणुकीची तयारी सध्या जोरात सुरू आहे.
श्री वीर हनुमान सेवाभावी समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जन्मोत्सवानिमित्त या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत धार्मिक श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
या शोभायात्रेचं मुख्य आकर्षण ठरणार आहे मध्यप्रदेशातील उज्जैन महाकाल येथून येणारा ‘गजराज’ हत्ती. तसेच हरियाणातून येणारे कलाकार काली मातेची जिवंत प्रतिकृती, शिव-पार्वती विवाह सोहळा आणि विविध धार्मिक सादरीकरणं सादर करणार आहेत.
मिरवणुकीत प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती आणि संकटमोचन हनुमानाची सजीव वाटणारी प्रतिकृती भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेणार आहे. आधुनिक साउंड सिस्टिम आणि आकर्षक लाईटिंगमुळे शोभायात्रा अधिक दिमाखदार होणार आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘महाराष्ट्र किंग श्री स्टार बँड’, ‘नेहरू स्टार बँड’सह विविध बँड पथकं या सोहळ्याला जल्लोषपूर्ण वातावरण देणार आहेत. पारंपरिक वारकरी दिंडी, आदिवासी नृत्य, माझलीचे खेळ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ही शोभायात्रा धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक पर्व ठरणार आहे.
समितीच्या वतीने शहरवासीयांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकूणच, हनुमान जयंतीनिमित्त अमरावतीत निघणारी ही भव्य शोभायात्रा भक्ती, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम घडवून शहरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करणार आहे.



