साताऱ्यात भीषण अपघात! जळव घाटात पिकअप पलटी – 1 महिला ठार, 9 जण जखमी

राज्यात रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असताना, अपघातांची मालिका मात्र थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात भीषण अपघात घडला आहे.
पाटण तालुक्यातील निवकणे गावाजवळील जळव घाटात भाविकांची पिकअप गाडी पलटी झाल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे 8 ते 10 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाविक जानाई देवीच्या दर्शनासाठी जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी घाटात पलटी झाली. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून गंभीर जखमींना साताऱ्यात तर इतरांना तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून मदतकार्य हाती घेतले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
जानाई देवी हे भाविकांचे जागृत श्रद्धास्थान मानले जाते. देवीचे मूळस्थान पाटण तालुक्यातील डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेल्या निवकणे येथे आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनंतर जेजुरी येथून जानाई देवीची पालखी निवकणेकडे प्रस्थान करते आणि तेथे भव्य यात्रा भरते. यंदा जेजुरीतही यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.
सध्या जखमींवर उपचार सुरू असून, मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.



