शटर तोडून चोरी करणारे आरोपी CCTV मध्ये कैद!

नागपुरातील टेलिफोन एक्सचेंज चौकाजवळील प्यूमा शोरूमचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातून प्यूमा कंपनीचे ६ जोडी बूट, १४ जॅकेट व अप्पर, विविध अॅक्सेसरीज आणि सुमारे ७,३५० रुपये रोख रक्कम असा एकूण ८८ हजार ७०२ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दुकान व्यवस्थापक प्रविण पांडे यांना सकाळी ही घटना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तब्बल १५० CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींचा शोध घेतला. रौनक चौधरी (वय २०) आणि सुमीत मेश्राम (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील काही मुद्देमाल जप्त केला असून, त्यामध्ये जॅकेट, टी-शर्ट, चप्पल आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंज पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली.
तांत्रिक तपास आणि CCTV विश्लेषणाच्या मदतीने नागपूर पोलिसांनी ही चोरी उघड करत मोठं यश मिळवलं आहे. शहरात वाढत्या दुकानफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच आहे.



