AmravatiamravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimeNagpur

नागपूरहून चोरीला गेलेली दीड कोटींची शिवशाही बस अमरावतीत जप्त

राजापेठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तेलंगणातील तरुण अटकेत, आंतरराज्यीय बसचोरीच्या गुन्ह्यांची चौकशी सुरू

अमरावती | प्रतिनिधी

नागपूर येथील इमामवाडा बसस्थानकातून चोरीला गेलेली सुमारे १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची शिवशाही बस अवघ्या काही तासांत अमरावतीतील राजापेठ पोलिसांनी शोधून काढत आरोपीला अटक केली. या कारवाईमुळे संभाव्य आंतरराज्यीय वाहनचोरीच्या साखळीचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली असून, आरोपीकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या इमामवाडा बसस्थानकात चार्जिंगसाठी उभी असलेली एमएच-१४ बीटी-२५८८ क्रमांकाची शिवशाही बस अज्ञात व्यक्तीने चोरी करून नेली. बस चोरीची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी राज्यातील विविध जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला.

सूचना मिळाल्यानंतर अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित वाहनाचा माग काढण्यात आला. या कारवाईदरम्यान विष्णू गणपती नीलकर (वय २३, रा. गडवाल, तेलंगणा) याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिस चौकशीत आरोपीने बस चोरीची कबुली दिली. प्राथमिक चौकशीनुसार, चोरी केलेल्या बसमधील बॅटरी, टायर आणि डिझेल वेगळे करून त्यांची विक्री करण्याचा त्याचा हेतू असल्याचे समोर आले आहे.

तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती उघड झाली असून, आरोपीने तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि हैदराबाद परिसरात यापूर्वीही सुमारे २० बस चोरी केल्याचा दावा चौकशीत समोर आला आहे. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी संबंधित राज्यांतील पोलिसांशी समन्वय साधून तपास सुरू आहे.

राजापेठ पोलिसांनी चोरीची १ कोटी ५३ लाख रुपयांची शिवशाही बस जप्त केली असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का आणि इतर गुन्ह्यांशी आरोपीचा संबंध आहे का, याचाही सखोल तपास करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून, या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button