14 वर्षीय मुलावर चाकू हल्ला; आरोपीला अटक, कलमना पोलिसांची तातडीची कारवाई

सजग नागरिकाच्या धाडसामुळे मुलाचा जीव वाचला; आरोपीची जाहीर धिंड काढत पोलिसांचा कठोर इशारा
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातील कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिप्टी सिग्नल परिसरात 14 वर्षीय मुलावर प्राणघातक चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयित आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा एका कार्यक्रमावरून घरी परतत असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराने जीव घेण्याच्या उद्देशाने वार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेच्या वेळी परिसरात उपस्थित असलेले मदन वर्मा यांनी प्रसंगावधान राखत तातडीने हस्तक्षेप केला. त्यांच्या धाडसामुळे मुलाचा जीव वाचल्याचे सांगितले जात असून, स्थानिक नागरिकांकडून त्यांच्या धैर्याचे कौतुक करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच कलमना पोलिसांनी विशेष पथकाच्या मदतीने तपास सुरू केला. काही तासांतच पोलिसांनी निलेश भोयर (वय 19) याला ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीची परिसरात जाहीर धिंड काढण्यात आली. या कारवाईद्वारे कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा संदेश देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणाचा पुढील तपास कलमना पोलीस करीत आहेत.



