Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेत राजकीय वाद; 17 नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

नियमित सर्वसाधारण सभा घेत नसल्याचा आरोप; नगराध्यक्षांनी आरोप फेटाळत लवकरच सभा घेणार असल्याचे स्पष्ट केले

अमरावती | प्रतिनिधी

अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेतील राजकीय वातावरण सध्या तापले असून, उपनगराध्यक्ष प्रियंका मालठाणे यांच्यासह 17 नगरसेवकांनी नगराध्यक्षांकडून नियमित सर्वसाधारण सभा घेतली जात नसल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.

नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनानुसार, नगरपरिषद नियम, 1965 मधील कलम 81 नुसार नियमित सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. मात्र, नगराध्यक्षांकडून वारंवार सभा घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, या आरोपांवर नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, सत्तास्थापनेनंतर आतापर्यंत दोन सर्वसाधारण सभा घेण्यात आल्या आहेत. तिसरी सभा विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रद्द करण्यात आली होती.

नगराध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, रद्द झालेली ही सभा पुढील सात ते आठ दिवसांत आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल.

या घडामोडींमुळे अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेतील राजकीय वाद पुन्हा चर्चेत आला असून, नगरसेवकांच्या तक्रारीवर जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button