citynewsDhamangaonLatest NewsMaharashtra

वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

अधिकारी गैरहजर असल्याचा आरोप; समस्या न सुटल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

अमरावती | प्रतिनिधी

धामणगाव रेल्वे तालुक्यातील कामणापूर घुसळी, काशीखेड आणि वाढोणा या गावांमध्ये वारंवार होणाऱ्या वीज खंडितीच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महावितरणच्या नारगांवडी येथील कार्यालयात धडक देत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित गावांमध्ये दिवसातील सुमारे बारा तास वीजपुरवठा खंडित होत असून अनेकदा रात्रभरही वीज उपलब्ध राहत नाही. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वीजपुरवठा नियमित नसतानाही चार ते पाच हजार रुपयांपर्यंतची वीजबिले येत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावरील विद्युत दिवे बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

या समस्यांबाबत अनेक वेळा महावितरणकडे निवेदने देऊनही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अखेर समस्यांचे निराकरण व्हावे या मागणीसाठी त्यांनी नारगांवडी येथील महावितरण कार्यालय गाठले. मात्र, तेथे कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

ग्रामस्थांनी वीजपुरवठा सुरळीत करावा, बंद असलेले पथदिवे सुरू करावेत आणि वीजबिलांबाबतच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत महावितरणची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ग्रामस्थांच्या मागण्यांवर प्रशासन किती लवकर कार्यवाही करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button