गणेशपेठ पोलिसांची कारवाई; 5.49 ग्रॅम एमडी पावडरसह आरोपी अटकेत

कॉटन मार्केट परिसरात सापळा रचून कारवाई; एमडी पावडर, मोबाईल आणि ई-रिक्षासह 1.06 लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर | प्रतिनिधी
कॉटन मार्केट परिसरातील कल्पना वाईन शॉपच्या मागे एमडी पावडर विक्रीसाठी आलेल्या एका ३५ वर्षीय आरोपीला गणेशपेठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अमोल भाऊराव गायकवाड (वय ३५, रा. चिखला पायाभांग, ता. कुही, जि. नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ५.४९ ग्रॅम एमडी पावडर, मोबाईल फोन आणि ई-रिक्षा, असा एकूण १ लाख ६ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खात्रीशीर माहितीवरून सापळा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ४.२५ ते ५.४० वाजताच्या दरम्यान गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, कॉटन मार्केट येथील कल्पना वाईन शॉपच्या मागे अमोल नावाचा इसम ई-रिक्षातून एमडी पावडर विक्रीसाठी येणार आहे.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. काही वेळाने मिळालेल्या वर्णनाशी मिळताजुळता इसम मालवाहू ई-रिक्षा क्रमांक एमएच-४९-एआर-७९९१ घेऊन त्या ठिकाणी आला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले.
शर्टच्या अस्तीनमध्ये लपवली होती एमडी पावडर
पंचासमक्ष आरोपीची ओळख पटवून त्याचे नाव-पत्ता विचारण्यात आला. त्याने आपले नाव अमोल भाऊराव गायकवाड असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अंमली पदार्थ असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी एनडीपीएस कायद्यातील तरतुदींचे पालन करून त्याची अंगझडती घेतली.
झडतीदरम्यान आरोपीने घातलेल्या शर्टच्या अस्तीनमध्ये दोन झिपलॉक पिशव्यांमध्ये लपवून ठेवलेली एकूण ५.४९ ग्रॅम एमडी पावडर पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर एमडी पावडर, एक मोबाईल फोन आणि ई-रिक्षा असा एकूण १ लाख ६ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आर्थिक फायद्यासाठी विक्रीचा आरोप
आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एमडी पावडर विक्री करण्याच्या उद्देशाने ती बाळगत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. या प्रकरणी गणेशपेठ पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास गणेशपेठ पोलिसांकडून सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त विनिता शाहू, पोलिस उपआयुक्त राहुल मदने आणि सहायक पोलिस आयुक्त राजेश टटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल तावडे, दुय्यम पोलिस निरीक्षक टिकराम थाटकर, महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिया सोमणकर, पोलिस उपनिरीक्षक अरुण पाटील, सफौ समीर शेख, तसेच पोलीस अंमलदार राम, प्रकाश, सागर आणि वैभव यांचा सहभाग होता.



