रविवारची रात्र ठरली काळरात्र! पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी रात्री भीषण अपघात घडून एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या अपघातात दोन लहान मुले जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.ही घटना मंचर परिसरात घडली असून, एका खासगी बस आणि कारमध्ये जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी मल्लिकार्जुन आंबेगावे हे आपल्या कुटुंबासह नाशिक येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते परतत असताना मंचर परिसरात त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले.यावेळी कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला गेली आणि पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या खासगी बसला जोरदार धडक दिली.या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील सदोष रचनेमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप केला असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.अपघातात जखमी झालेल्या दोन लहान मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.



