पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘पगमार्क’ पाणवठ्यांची संकल्पना; वन्यजीव संवर्धनासोबत पर्यटनालाही चालना

उन्हाळ्याच्या कडक झळांमध्ये वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी एक अनोखा आणि कलात्मक प्रयोग सध्या चर्चेत आला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या पावलांच्या ठशांच्या आकारातील ‘पगमार्क’ पाणवठे तयार करण्यात आले असून, या उपक्रमामुळे वनसंवर्धनासोबतच पर्यटनालाही नवी दिशा मिळत आहे.
उन्हाळा हा जंगलातील वन्यजीवांसाठी सर्वात कठीण काळ मानला जातो. पाण्याच्या शोधात अनेक प्राणी लांब अंतर भटकतात, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.
हीच गरज ओळखून पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने ‘पगमार्क वॉटर होल’ ही अभिनव संकल्पना राबवली आहे. चोरबाहुली वनपरीक्षेत्रातील अंबाझरी तिप्पट, टूयापार रोड, टायगर पाणवठा घाटमारा, भाटा रोड टी-पॉइंट आणि बाजारकुंड या ठिकाणी वाघाच्या पावलांच्या आकारातील आकर्षक पाणवठे तयार करण्यात आले आहेत.
या पाणवठ्यांची विशेषता म्हणजे मोठ्या प्राण्यांपासून ते लहान पक्षी आणि सूक्ष्म जीवांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षित आणि सुलभ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी उपसंचालक अक्षय गजभिये आणि सहाय्यक वनसंरक्षक पूजा लिमगावकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. याआधी मेळघाट आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी ठरले होते. त्याच अनुभवाच्या आधारे पेंचमध्ये हा उपक्रम अधिक आकर्षक आणि आधुनिक पद्धतीने राबवण्यात आला आहे.
वनपरीक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी सांगितले की, उन्हाळ्यात वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘पगमार्क वॉटर होल’ ही संकल्पना जैवविविधतेला चालना देणारी ठरणार असून, पर्यावरणीय संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
हा उपक्रम केवळ वन्यजीव संवर्धनापुरता मर्यादित नसून, पर्यटकांसाठीही आकर्षण ठरत आहे. निसर्ग आणि कलात्मकतेचा सुंदर संगम पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढत आहे.
वन्यजीव संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि पर्यटन यांचा संगम साधणारा ‘पगमार्क’ पाणवठा उपक्रम पेंचसाठी एक नवा आदर्श ठरत आहे. अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ होईल, यात शंका नाही.



