यवतमाळमध्ये प्रवासी ट्रॅव्हलरला भीषण आग; 17 प्रवासी थोडक्यात बचावले

वर्धा वरून नांदेडकडे जाणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हलर वाहनाला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असले, तरी सुदैवाने वाहनातील सर्व 17 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील भारी विमानतळ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. वर्धा वरून नांदेडकडे निघालेल्या मिनी ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या वाहनात एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते, ज्यामध्ये 2 लहान मुले, 3 महिला आणि 12 पुरुषांचा समावेश होता. हे सर्वजण नांदेड येथे आयोजित वेलनेस शिबिरासाठी जात होते.
प्रवासादरम्यान अचानक वाहनातून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांनी तात्काळ वाहनातून बाहेर पडत आपला जीव वाचवला.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. माहिती मिळताच यवतमाळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत संपूर्ण ट्रॅव्हलर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाली होती.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट किंवा इंजिनमधील बिघाडाचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अशा घटनांमुळे प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



